Anant Garje and Gauri Palave Case | भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक असलेल्या अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्यानंतर हा संपूर्ण मामला राज्यभर चर्चेत आहे. सोमवारी सकाळी मोहोज देवढे येथे तणावपूर्ण वातावरणात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीपूर्वी तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेच्या अटकेची जोरदार मागणी केली होती. त्यानंतर अनंत गर्जे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून घराजवळ परंतु काही अंतरावर डॉ. गौरी गर्जे (Gauri Garje) यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. सासरे भगवान गर्जे यांनी विधी पूर्ण केला. या घटनेमुळे परिसरात आणि वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लग्नापूर्वीच माहिती होती प्रेमसंबंधांची? कोर्टात धक्कादायक दावा :
अनंत गर्जेच्या पोलिस कोठडीत सुनावणीदरम्यान त्याच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. अनंत गर्जे यांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती डॉ. गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांना विवाहाआधीच देण्यात आली होती, असा दावा बचाव पक्षाने केला आहे. त्यामुळे आत्महत्या करण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप योग्य नसल्याचा मुद्दा युक्तिवादादरम्यान मांडला गेला.
तसेच सरकारी वकिलांनी याला जोरदार विरोध केला आहे. त्यांनी सांगितले की, गौरी पालवे यांचे वडील अशोक पालवे यांनी केलेल्या आरोपांवर आधारित मूळ कागदपत्रे लातूर येथील रुग्णालयात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही कागदपत्रे ताब्यात घेऊन तपास करणे आवश्यक असल्याचे मत सरकार पक्षाकडून मांडण्यात आले. (Anant Garje and Gauri Palave Case)
अनंत गर्जेसोबतच त्याच्या भावंडांवरही गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांचा शोध सुरू असल्याचेही सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Anant Garje and Gauri Palave Case | फॉरेन्सिक टीमचा तपास सुरू :
अनंत गर्जे मुंबईतील वरळी बीडीडी चाळीत भाडेतत्त्वावर राहतो. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून फॉरेन्सिक पथकाने गर्जेच्या घराची तपासणी केली. डॉ. गौरी यांनी आत्महत्या कोणत्या परिस्थितीत केली याबाबत महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अॅड. मंगेश देशमुख यांनी मांडलेल्या बचावानंतरही न्यायालयाने अनंत गर्जेला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस या प्रकरणात अनेक नव्या बाबी उघड होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून समाजामध्येही चर्चेला उधाण आले आहे. पुढील सुनावणी अत्यंत महत्वाची ठरणार आहे.






