Amravati Election Result | अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांचे मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू विवेक भारतीय या दोघांचाही पराभव झाला आहे. त्यामुळे विदर्भातील महत्त्वाच्या अमरावती शहरात भाजपच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नातेवाईकांना उमेदवारी देण्याचा प्रयोग भाजपला महागात पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणूक निकालानंतर अमरावतीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल दिसून येत असून काँग्रेस आणि इतर पक्षांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्याचे चित्र आहे.
फडणवीसांच्या मामेभावाला काँग्रेसकडून पराभव :
अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपचे उमेदवार विवेक कलोती यांचा काँग्रेसचे संजय शिरभाते यांनी सुमारे 800 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे या प्रभागातून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे या भागात भाजपचा पारंपरिक प्रभाव कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (Amravati Election Result)
2018 मध्ये विवेक कलोती यांची अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती. मात्र यावेळी त्यांना मतदारांचा अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही, त्यामुळे भाजपसाठी हा निकाल प्रतिष्ठेचा धक्का मानला जात आहे.
Amravati Election Result | आमदार श्रीकांत भारतीय यांच्या भावाचाही पराभव :
याच प्रभागातून आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू विवेक भारतीय यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे एकाच प्रभागात भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांच्या नातेवाईकांचा पराभव झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
एकूण 87 जागांच्या अमरावती महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी काँग्रेस आणि इतर पक्षांनीही जोरदार कामगिरी केली आहे. भाजपला 20 जागा, काँग्रेसला 15 जागा, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला 11 जागा, एमआयएमला 6 जागा, युवा स्वाभिमानला 4 जागा, बसपाला 3 जागा, शिवसेना शिंदे गटाला 2, ठाकरे गटाला 1 आणि प्रहारला 1 जागा मिळाली आहे.
सत्ता स्थापनेसाठी चुरशीची लढत :
महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 44 जागांची आवश्यकता असून सध्या कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे आता आघाडी आणि युतींच्या चर्चांना वेग आला असून अमरावतीतील पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकंदर पाहता, अमरावती महापालिका निवडणूक निकालाने भाजपला मोठे धक्के दिले असून काँग्रेससह इतर पक्षांसाठी ही निवडणूक उत्साहवर्धक ठरली आहे.






