हुंडा मागणाऱ्या लोकांवर मुलींनी थुंकायला हवं; अंबादास दानवेंचा थेट इशारा

On: May 23, 2025 6:09 PM
Ambadas Danve
---Advertisement---

Vaishnavi Hagawane  | पुण्यात हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून सतत होणाऱ्या छळामुळे वैष्णवी हगवणे या तरुणीने आपले जीवन संपवले. या घटनेनंतर महाराष्ट्रभरात मोठी संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील महिला नेत्यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली असून राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोगांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अजित पवारांचा वडिलांना धीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही या घटनेवर कठोर भूमिका घेत, वैष्णवीच्या वडिलांशी फोनवरून संवाद साधून त्यांना धीर दिला आहे. “लग्नाच्या वेळी मला माहिती असती तर मी लग्न होऊ दिले नसते,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच, वैष्णवीला न्याय मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी स्पष्ट केला आणि पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अंबादास दानवेंचा संताप

या घटनेनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही संताप व्यक्त केला आहे. हुंडा मागणाऱ्या लोकांवर मुलींनी थुंकायला हवे, असे  त्यांनी म्हटले आहे. “पुण्यासारख्या शहरात अशी घटना होणे खूपच चिंताजनक आहे. मुलींनी अशा लोकांशी लग्न करू नये. हुंड्यासाठी होणारा छळ थांबवायला हवा. असा छळ करणाऱ्यांना जिवंत सोडू नये,” असे त्यांनी सांगितले. याचबरोबर त्यांनी विचारले की, कोट्यवधी रुपये देऊनही जर मुलींचा छळ होत असेल तर पैसा कोणाकडून येतो?

दरम्यान, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना २३ मे रोजी सकाळी अटक करण्यात आले आहे. ४:३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य होते. वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांनाही यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे.

Join WhatsApp Group

Join Now