Pregnant Women’s | गर्भवती महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होण्याच्या समस्या वाढत असून अॅनिमियाचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात (National Family Health Survey) 15 ते 49 वयोगटातील 57 टक्के महिलांमध्ये अॅनिमिया आढळून आला आहे. विशेष म्हणजे, गरोदर महिलांमध्ये हे प्रमाण गंभीर असून उपचारांची गरज वाढली आहे.
सातत्याने वाढणाऱ्या अॅनिमियाच्या घटनांची नोंद-
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दरवर्षी गरोदर (Pregnant Women’s) महिलांची तपासणी केली जाते. त्यानुसार 2021-22 मध्ये 3.28 लाख गरोदर महिलांपैकी 2.33 लाख महिलांमध्ये अॅनिमिया आढळून आला. पुढील वर्षांमध्येही ही स्थिती गंभीर राहिली आहे. 2022-23 मध्ये 3.42 लाखांपैकी 2.61 लाख महिलांना अॅनिमिया होता, तर 2023-24 मध्ये 3.89 लाखांपैकी 2.46 लाख महिलांना या समस्येचा सामना करावा लागला.
यावरून स्पष्ट होते की, दरवर्षी तपासल्या गेलेल्या गर्भवती महिलांपैकी सुमारे 70 टक्के महिलांना अॅनिमिया होतो. अॅनिमियामुळे प्रसूती दरम्यान गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी योग्य आहार, पूरक औषधं आणि नियमित तपासणी आवश्यक आहे.
पुण्यात दर 10 हजार गरोदर महिलांमध्ये गंभीर अॅनिमिया-
पुणे विभागातील (Pune Division) आरोग्य तपासणीतून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, दर 10 हजार गरोदर महिलांमध्ये (Pregnant Women’s) तीव्र अॅनिमियाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. 220-25 या कालावधीत 4 लाख 6 हजार 438 महिलांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 2 लाख 66 हजार महिलांमध्ये अॅनिमिया निदान झालं. या महिलांमध्ये 7 ते 10 हजारांपेक्षा जास्त जणींना गंभीर अॅनिमिया आहे.
हिमोग्लोबिनचे प्रमाण 7 ग्रॅम/डीएल पेक्षा कमी असणाऱ्या गर्भवती महिलांना उच्च जोखमीच्या गटात समाविष्ट करण्यात येतं. आरोग्य विभागाकडून अशा महिलांवर विशेष लक्ष दिलं जातं. मात्र, वाढत्या प्रमाणामुळे सरकारी यंत्रणांना अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज आहे.






