Sangram Jagtap | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “कारणे दाखवा नोटीस” देण्याचे निर्देश दिले आहेत. अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितले की, “पक्षाच्या विचारसरणीविरोधात कोणतीही भूमिका घेतल्यास ती राष्ट्रवादीला मान्य नाही.”
वादग्रस्त वक्तव्यावरून पक्षात खळबळ :
सोलापुरातील एका हिंदू आक्रोश मोर्चा कार्यक्रमात बोलताना संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दीपावलीची खरेदी फक्त हिंदू व्यापाऱ्यांकडूनच करा असे वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते, “आपल्या सणांचा नफा हिंदू समाजालाच मिळायला हवा. आज मंदिरांवर आणि हिंदूंवर होणारे हल्ले मशिदींमधून होत आहेत.”
या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाच्या ध्येयधोरणापासून जगताप सतत विचलित होत असल्याची चर्चा सुरू आहे.
Sangram Jagtap | अजित पवारांचा इशारा आणि कारवाईची तयारी :
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांचं वक्तव्य चुकीचं आहे. पक्षाची विचारसरणी एकसंध आहे आणि त्याविरुद्ध जाणं आम्हाला मान्य नाही. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.”
पवारांनी पुढे सांगितले की, “पक्षाचं ध्येयधोरण ठरल्यानंतर कुणीही आमदार, खासदार किंवा नेता स्वतःच्या मनाने वेगळी भूमिका घेऊ शकत नाही. अशी वागणूक पक्षशिस्तीला धरून नाही.”
राष्ट्रवादीत नाराजी आणि राजकीय चर्चा :
गेल्या काही काळापासून संग्राम जगताप यांची हिंदुत्ववादी भूमिका ठळकपणे समोर येत आहे. त्यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यांमुळे पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. तसेच जगताप यांचे सासरे शिवाजी कर्डिले हे भाजपचे आमदार असल्यामुळे, अजित पवार कारवाई करतील तरी जगताप भाजपकडे झुकतील का, असा प्रश्नही राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र स्पष्ट केलं आहे की, पक्षधोरणाविरुद्ध जाणाऱ्या कोणालाही माफी नाही. त्यामुळे संग्राम जगतापांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






