Ajit Pawar Plane Crash | 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या दुर्घटनेत त्यांच्यासह इतर सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यभर शोककळा पसरली होती. अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात असल्याने आता सर्वांचे लक्ष अधिकृत चौकशी अहवालाकडे लागले आहे.
अपघात कसा घडला, तांत्रिक बिघाड होता की इतर काही कारण, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही राजकीय नेत्यांनी घातपाताची शक्यताही व्यक्त केली आहे. त्यामुळे या दुर्घटनेचा तपास आणि त्याचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
अहवालाची तारीख जाहीर :
या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, 28 फेब्रुवारीपूर्वी या अपघाताचा प्राथमिक अहवाल जाहीर केला जाणार आहे. तपास यंत्रणा नियमानुसार चौकशी करत असून वेळोवेळी माहिती दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणीही काही नेत्यांनी केली होती. मात्र केंद्र सरकारकडून तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी नागरी विमान वाहतूक विभागाने अधिकृत प्रसिद्धीपत्रकही जारी केले होते.
Ajit Pawar Plane Crash | अपघात नेमका कसा झाला? :
मिळालेल्या माहितीनुसार, 28 जानेवारी रोजी सकाळी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. विमान बारामती विमानतळाजवळ पोहोचले असता पहिल्या प्रयत्नात धावपट्टीवर लँडिंग होऊ शकले नाही. त्यानंतर दुसरा प्रयत्न करण्यात आला. मात्र धावपट्टीपासून काही अंतरावरच विमान कोसळले. या दुर्घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. (Ajit Pawar Plane Crash News)
आता 28 फेब्रुवारीपूर्वी प्राथमिक अहवाल जाहीर होणार असल्याने या अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तांत्रिक बिघाड, हवामान, मानवी चूक की अन्य कोणते कारण आहे याबाबतचा खुलासा अहवालातून होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या अहवालाकडे लागले आहे.






