Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. युवा संवाद मेळाव्यात त्यांनी युवा नेत्यांना मार्गदर्शन करत संघटन बळकट करण्यावर भर दिला. यावेळी त्यांनी काही स्पष्ट व थेट भाषेत वक्तव्य करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं.
शरद पवारांचा उल्लेख
युवा संवाद मेळाव्यात भाषण करताना अजित पवारांनी आपल्या यशाचं श्रेय शरद पवार यांना दिलं. त्यांनी म्हटलं, “कर्मधर्म संयोग, आईवडिलांची आणि चुलत्याची कृपा यामुळेच आमचं बरं चाललं आहे.” हे विधान ऐकून अनेकांचे भुवया उंचावल्या आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन वर्षांहून अधिक काळ झाला असून अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर दोघांमधील अंतर वाढत गेले असून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांनी स्वतःच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. मात्र, पराभव स्वीकारावा लागला.
या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी शरद पवारांचा भावनिक उल्लेख केल्यामुळे नवीन राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांत दोघे एकाच मंचावर आले असले तरी ती भेट औपचारिक होती. आजच्या वक्तव्यानंतर मात्र त्यांच्या नात्याबाबत नवे तर्क-वितर्क उपस्थित होऊ लागले आहेत.
संघटन बळकट करा, अयोग्य वर्तनाला माफी नाही
अजित पवारांनी युवकांना मार्गदर्शन करताना सामाजिक प्रश्नांवर काम करण्यासाठी संघटन मजबूत करण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, बेरोजगारी, शिक्षण, व्यवसाय यासारख्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. गावपातळीपर्यंत संघटना पोहोचवावी, नागरिकांच्या अडचणी फक्त ऐकू नयेत, तर त्या सोडवाव्यात.
डिजिटल माध्यमांचा उपयोग प्रचारासाठी करण्याचा सल्ला देतानाच त्यांनी अयोग्य संदेश किंवा सोशल मीडियावरील गैरवर्तनाबद्दल कठोर इशाराही दिला. “तुम्ही वाटतं डिलिट केलं, पण सगळं रिकव्हर होतं. गावाकडं अंडीपिल्ली बाहेर येतात,” अशा शब्दांत त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला. कुणी गैरकृत्य करत असेल तर “त्याला टायरमध्ये घ्या, ठोकून काढा,” अशा कठोर भाषेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. राजकारणाशी संबंध नसलेल्यांची दादागिरीही सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
“आजचे पुढारी पाया पडण्यालायक नाहीत,” असं ठाम मत व्यक्त करत त्यांनी नेत्यांऐवजी महापुरुषांच्या पाया पडण्याचा सल्ला दिला. शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा युगपुरुषांचा उल्लेख करत त्यांनी आदर व्यक्त केला.
Title: Ajit Pawar Credits Sharad Pawar Again






