अजित पवारांचा थेट छगन भुजबळांना फोन, दिलगिरी व्यक्त करत म्हणाले…

On: February 7, 2025 6:31 PM
Ajit Pawar Calls Chhagan Bhujbal  
---Advertisement---

Ajit Pawar | महायुती सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजीनाट्य सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मंत्रिमंडळ विस्तारात डावलले गेल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यांना कोणतेही मंत्रीपद मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली होती. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट छगन भुजबळ यांना फोन करून त्यांच्या नाराजीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

अजित पवारांचा थेट फोन

छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. “मी एक साधा कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय, कोणाला काही फरक पडतो?” असे भुजबळ म्हणाले होते. तसेच, ज्यांनी मंत्रिपद दिले नाही त्यांनाच प्रश्न विचारावा, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी आपल्या वक्तव्यातून लगावला होता.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना थेट फोन करून संवाद साधल्याचे समजते. पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी याबाबत सांगितले की, “चार दिवसांपूर्वी अजित पवारांचा फोन आला. त्यांनी उशिरा फोन केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि भेटून चर्चा करण्याचे आश्वासन दिले.” यामुळे आता भुजबळांची नाराजी दूर झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

शिवभोजन थाळी सुरू ठेवावी- भुजबळ

छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळातील नाराजीवर भाष्य करतानाच काही महत्त्वाच्या विषयांवरही लक्ष वेधले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाशिक कुंभमेळा, कांद्यावरील निर्यातबंदी आणि शिवभोजन थाळी यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.

भुजबळ यांनी स्पष्ट केले की, “राज्यात हजारो कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. गरीबांना मोठा फायदा होत असल्याने शिवभोजन थाळी योजना बंद होऊ नये. लाखो लोक या योजनेचा लाभ घेत आहेत आणि अनेकांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे सरकारने ती पुढे सुरू ठेवावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.”

Title: Ajit Pawar Calls Chhagan Bhujbal  

 

Join WhatsApp Group

Join Now