Ajit Pawar | महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून तीव्र वाद सुरु आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटला मंजुरी देत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजात आपले आरक्षण धोक्यात येईल, अशी भीती निर्माण झाली आहे. या भीतीमुळे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत महादेवराव कराड (वय ३५) या शेतकऱ्याने मांजरा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले. (bharat Karad Death)
अजित पवारांची भूमिका आणि आश्वासन :
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विटरवरून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि कराड कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी पवार म्हणाले, “लातूर जिल्ह्यातील भरत कराड यांनी ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून आत्महत्या केली ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करतो.
आपलं सरकार सर्व समाज घटकांच्या न्याय व हक्कांसाठी कटिबद्ध आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क देताना कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल.” तसेच, कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन करत पवारांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले.
Ajit Pawar | ओबीसी समाजाचे अस्तित्व धोक्यात? :
भरत कराड (Bharat karad) यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास ओबीसी समाजाचे अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती होती. फारसे शिक्षण नसल्यामुळे आपल्या मुलामुलींच्या भविष्यासंदर्भात ते सतत चिंतेत होते. “माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा,” असे त्यांनी आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत लिहून ठेवले होते.
या घटनेनंतर ओबीसी समाजात संताप व अस्वस्थता आहे. विविध संघटनांनी या प्रकरणी सरकारकडून स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी केली आहे.






