Aishwarya Rai | बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या वैयक्तिक नात्याबद्दल अनेकदा चर्चा रंगते. 2006 मध्ये ‘उमराव जान’ चित्रपटाच्या सेटवर त्यांचं प्रेम फुललं आणि 2007 मध्ये त्यांनी विवाह केला. 2011 मध्ये त्यांची मुलगी आराध्या त्यांच्या आयुष्यात आली. अलीकडे अभिषेक आणि निम्रत कौर यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे गॉसिपच्या मथळ्यांमध्ये भर पडली. अशातच, ऐश्वर्याच्या जुन्या मुलाखतीतील काही विधानं पुन्हा व्हायरल होत आहेत.
नात्यात समजूतदारपणा महत्त्वाचा-
दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) बच्चन यांनी अभिषेक बच्चनसोबतच्या नात्याविषयी सविस्तर बोलताना सांगितलं की, कोणत्याही नात्यात समजूतदारपणा आणि ‘गिव्ह अँड टेक’ खूप गरजेचा असतो.
View this post on Instagram
त्यांनी स्पष्ट केलं की, नात्यात मतभेद आणि सहमती दोन्ही असतात, पण महत्त्वाचं म्हणजे संवाद सुरू ठेवणं. त्या म्हणाल्या, “खूप समजूतदारपणा लागतो, खूप गिव्ह अँड टेक असतं. सहमती आणि असहमती दोन्ही असतात. पण संवाद सुरू ठेवणं फार महत्त्वाचं आहे. मी यावर कायम विश्वास ठेवला आहे.”
मैत्री आणि परस्पर आदरामुळे नातं टिकतं
त्याच मुलाखतीत ऐश्वर्याने असंही नमूद केलं की, अभिषेकने तिच्या या विचारांचा नेहमी आदर केला आहे. संवाद हे नात्याचं मुख्य स्तंभ आहे आणि ती नेहमीच यावर भर देते. तिने असंही सांगितलं की, ती अशा व्यक्तींपैकी नाही जी एखादा मुद्दा उद्यावर ढकलते आणि थांबते.
गरज भासली तर ती दुसऱ्या दिवशीही संवाद सुरू ठेवून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते. तिच्या मते, प्रत्येक नातं मैत्रीवर आधारित असावं. “मैत्री म्हणजे काय? संवादच ना? मी अशा लोकांपैकी नाही की, ‘आजच संपव आणि उद्यावर नेऊ नको’. गरज भासली तर तो संवाद दुसऱ्या दिवशीही चालेल,” असं त्या म्हणाल्या.
याच मुलाखतीत तिने आणखी एक मुद्दा मांडला की, जर एखाद्या दिवशी संवाद संपवता आला तर उत्तमच, पण नातं एखाद्या नियमपुस्तकानुसार चालत नाही. परस्पर वेळ घालवताना ओपन-माइंडेड राहणं आणि एकमेकांचा सन्मान ठेवणं गरजेचं आहे. तसेच, जोडीदाराविषयी संवेदनशील राहणंही महत्त्वाचं असल्याचं ऐश्वर्याने सांगितलं.






