Aishwarya Rai | विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिचा १ नोव्हेंबर रोजी वाढदिवस झाला. यानिमित्ताने तिचा एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला, ज्यामध्ये ती “माझं शरीर, माझी किंमत” असे म्हणताना दिसली. या वक्तव्याने सुरुवातीला चाहत्यांना मोठा धक्का बसला, पण त्यामागील सत्य वेगळेच होते.
व्हायरल व्हिडीओ आणि चाहत्यांमधील संभ्रम
ऐश्वर्या (Aishwarya) जरी सध्या चित्रपटांमध्ये कमी दिसत असली, तरी तिचा चाहतावर्ग प्रचंड आहे. तिचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा दिसताच, त्यात तिने “माझं शरीर, माझी किंमत” असे म्हटल्याने अनेकांना वाटले की ती स्वतःच्या अनुभवाविषयी बोलत आहे. तिच्या या धाडसी वक्तव्यामुळे सुरुवातीला चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र, हे वक्तव्य तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नव्हते. ऐश्वर्याने (Aishwarya) हा व्हिडीओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता, जो एका जाहिरातीचा भाग होता. ऐश्वर्या (Aishwarya) ब्युटी ब्रँड ‘लॉरियल पॅरिस’ (L’Oréal Paris) ची ब्रँड ॲम्बेसेडर असून, ही जाहिरात रस्त्यावरील महिलांच्या छेडछाडी (Street Harassment) संदर्भात होती.
छेडछाडीविरोधात दिला खंबीर संदेश
या जाहिरातीच्या माध्यमातून ऐश्वर्याने (Aishwarya) महिलांना रस्त्यावर होणाऱ्या छेडछाडीचा सामना कसा करावा, याबद्दल एक खंबीर संदेश दिला. “तुम्ही अशा प्रसंगांना कसे सामोरे जाता? त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहा. समस्येला थेट तोंड द्या. त्या व्यक्तीच्या डोळ्यात मान उंच करून पाहा,” असे ती व्हिडीओमध्ये म्हणताना दिसली.
तिने महिलांना आत्मसन्मान जपण्याचा सल्ला दिला. “स्त्रीत्व आणि नारीवाद असाच पाहिजे. माझे शरीर, माझी किंमत. कधीही तडजोड करू नका. स्वतःवर संशय घेऊ नका आणि आपल्या योग्यतेसाठी उभे राहा,” असे ती म्हणाली. “आपल्या ड्रेसला किंवा लिपस्टिकला दोष देऊ नका. रस्त्यावर होणाऱ्या छळात तुमची चूक नसते,” हा महत्त्वाचा संदेशही तिने दिला.






