Ahilyanagar Airport | अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुपा येथे स्वतंत्र ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. नागरी उड्डाण मंत्री किंजारापू नायडू यांना सादर केलेल्या निवेदनात लंके यांनी स्पष्ट केले की, तातडीने सुपा विमानतळ उभारणी शक्य नसल्यास शिर्डी विमानतळाचा विस्तार करून सुपा परिसराशी जोडणी करण्याचा प्रस्तावही विचारात घ्यावा. (Supa airport)
सुपा औद्योगिक क्षेत्रासाठी विमानतळाची गरज :
खा. लंके यांनी नमूद केले आहे की, सुपा हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक आणि व्यापारिक केंद्र आहे. येथे सुपा एमआयडीसीसह अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील कारेगांव, रांजणगाव औद्योगिक वसाहती आहेत, जिथे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. परंतु विमानसेवा नसल्याने उद्योगांचे दळणवळण, व्यापार आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थापनात अडचणी येतात. (Ahilyanagar Airport)
Ahilyanagar Airport | विमानतळामुळे होणारे फायदे :
लंके यांच्या मते, विमानतळाची सुविधा उपलब्ध झाल्यास सुपा आणि संलग्न परिसर एक मोठा औद्योगिक क्लस्टर बनेल. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल, नवीन उद्योगधंद्यांना चालना मिळेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी वाढतील. अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्पादन पुणे, मुंबई आणि इतर शहरांना जलद गतीने पाठवता येईल, वाहतूक खर्चात घट होईल आणि विशेषतः निर्यातक्षम वस्तूंना मोठा फायदा होईल.
अहिल्यानगर जिल्हा धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, शिर्डी, शनि शिंगणापूर, भिंगार, अहिल्यानगर किल्ला, अष्टविनायक मंदिरांसह अनेक पर्यटनस्थळांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. विमानतळामुळे या पर्यटकांच्या प्रवासात मोठी सुलभता निर्माण होईल आणि स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल.
संरक्षण क्षेत्रासाठी धोरणात्मक महत्त्व :
अहिल्यानगर जिल्ह्यात देशातील एकमेव आर्मर्ड कोर सेंटर व टँक फॅक्टरी आहे. संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने तातडीच्या हालचालींसाठी विमानतळ अत्यंत आवश्यक असल्याचे लंके यांनी स्पष्ट केले. हे पाऊल राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरेल.
जिल्हा हा डाळिंब, द्राक्ष, ऊस, कांदा यांसारख्या दर्जेदार कृषी उत्पादनांसाठी ओळखला जातो. विमानतळामुळे या उत्पादनांची निर्यात सोपी होईल, शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठ गाठण्याची संधी मिळेल आणि कृषी क्षेत्राची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. (Supa airport)
खा. लंके यांनी केंद्र सरकारला आवाहन केले आहे की, हा निर्णय केवळ सुपाच्याच नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा व महाराष्ट्राच्या औद्योगिक, कृषी, पर्यटन आणि संरक्षण क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे त्वरित निर्णय घ्यावा.






