Afghanistan Cricketers | पाकिस्तानने (Pakistan) केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये तीन तरुण अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्याने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. या भ्याड हल्ल्याचा अफगाणिस्तानचा (Afghanistan) कर्णधार राशिद खानने (Rashid Khan) तीव्र शब्दात निषेध केला आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.
होतकरू खेळाडूंचा बळी :
या हल्ल्यात कबीर (Kabir), सिबघतुल्लाह (Sibghatullah) आणि हारून या तीन होतकरू क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही खेळाडू पक्तिका प्रांतातील उरगुन येथून शराना येथे एक मैत्रीपूर्ण सामना खेळून परतले होते.
घरी परतल्यानंतर ते एका स्थानिक सभेमध्ये सहभागी झाले असतानाच, त्यांना लक्ष्य करण्यात आले. एसीबीने (ACB) पाकिस्तान (Pakistan) सरकारवर “भ्याड आणि क्रूर हल्ला” केल्याचा आरोप केला. ४८ तासांच्या युद्धविरामानंतरही पाकिस्तानी हवाई हल्ले सुरूच असून, अर्जुन (Arjun) आणि बर्मल (Barmal) जिल्ह्यांतील नागरी भागांना लक्ष्य केले जात आहे. तालिबान (Taliban) सरकारने याला युद्धविरामाचे उल्लंघन म्हटले असून, तणाव कमी करण्यासाठी दोहा (Doha) येथे चर्चा सुरू आहे.
तिरंगी मालिकेतून माघार :
या हल्ल्याच्या निषेधार्थ, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (Afghanistan Cricket Board) एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये (Pakistan) पुढील महिन्यात होणाऱ्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील तिरंगी मालिकेतून अफगाणिस्तानने माघार घेतली आहे. ही मालिका ५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान लाहोर (Lahore) आणि रावळपिंडी (Rawalpindi) येथे होणार होती, जी आता अनिश्चिततेत सापडली आहे.
कर्णधार राशिद खानने (Rashid Khan) सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया देत याला “पूर्णतः अनैतिक आणि क्रूर कृत्य” म्हटले आहे. “या हल्ल्यात महिला, मुले आणि देशासाठी स्वप्न पाहणारे क्रिकेटपटू मारले गेले. अशा अमानवी कृत्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई व्हायला हवी,” असे त्याने लिहिले. एसीबीच्या माघार घेण्याच्या निर्णयाचे स्वागत करत, “राष्ट्रीय सन्मान सर्वात महत्त्वाचा आहे आणि या कठीण प्रसंगी मी माझ्या लोकांसोबत आहे,” असेही त्याने ठामपणे सांगितले. एसीबीने (ACB) देखील या खेळाडूंचे निधन हे संपूर्ण क्रीडा समुदायाचे नुकसान असल्याचे म्हणत त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या.






