Adivasi Morcha | आपल्या हक्कांसाठी आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी आदिवासी समाजाने पुकारलेला उलगुलान लाँग मार्च आज मुंबईच्या वेशीवर दाखल झाला आहे. शहापूर येथून १४ सप्टेंबर रोजी निघालेला हा ऐतिहासिक मोर्चा सलग दोन दिवस चालत मुंबईच्या दिशेने सरकत आला. हजारो आदिवासी बांधव, महिला, वृद्ध, तरुण आणि विद्यार्थी यांचा यात मोठा सहभाग दिसून आला. (Adivasi Morcha News)
मुलुंड-नवघर परिसरात पोहोचल्यावर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना थांबवले. पूर्व द्रुतगती महामार्गावर यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी गर्दी मुख्य रस्त्यावरून बाजूला करून सर्व्हिस रोडवर वळवली. तणावपूर्ण वातावरणात पोलिस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये चर्चा सुरू असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लकी भाऊ जाधवांचे सरकारला आव्हान :
मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी भाऊ जाधव करत आहेत. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “आम्ही दोन तासांपासून वाट पाहतोय. आता फक्त दहा मिनिटं आहेत. जर भेटीचं पत्र आलं नाही, तर आम्ही मंत्रालयावर थेट कूच करू. आमचा संयम सुटला आहे. काय गुन्हे करायचे ते करा, पण आम्ही मागे हटणार नाही,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. (Adivasi Long Morcha)
या विधानामुळे आंदोलनाचा रंग अधिक तीव्र झाला असून, मंत्रालयापर्यंत मोर्चा पोहोचल्यास मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Adivasi Morcha | आदिवासींच्या प्रमुख मागण्या :
– जात पडताळणी सुधारणा: बोगस प्रमाणपत्रे रद्द करणे आणि समित्यांना पुन्हा तपासणीचे अधिकार.
– आरक्षणाचे रक्षण: धनगर व बंजारा समाजाची आदिवासी आरक्षणात घुसखोरी थांबवणे.
– रिक्त पदांची भरती: अनुसूचित जमातीच्या कोट्यातील हजारो जागा तातडीने भरणे.
– पेसा कायद्याची अंमलबजावणी: आदिवासी गावांना नैसर्गिक आणि प्रशासकीय अधिकार देणे. (Adivasi Long Morcha)
– वनजमिनींचा हक्क: आदिवासींच्या ताब्यातील जमीन त्यांच्या नावावर करणे.
मोर्चेकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आदिवासींच्या या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र होण्याची भीती आहे. मंत्रालयापर्यंत पोहोचणाऱ्या या मोर्चाचा पुढील टप्पा नेमका कसा असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.






