Sharad Ponkshe | स्वातंत्र्य मिळून जवळपास ७९ वर्षे उलटून गेल्यानंतरही हिंदू बहुल देशात हिंदूंनाच स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे, ही मोठी शोकांतिका असल्याचे मत ज्येष्ठ मराठी रंगकर्मी आणि अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी व्यक्त केले. हिंदू समाजाने आपल्या महान परंपरेची आणि अस्मितेची जाणीव ठेवून संघटित होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुण्यातील कोथरूड परिसरातील परमहंस नगर येथे आयोजित ‘हिंदू संमेलन’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांसह आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू समाज पूर्णपणे जागा होऊन स्वतःच्या हक्कांसाठी उभा राहिला तरच समाजाचे एकत्रीकरण शक्य होईल, असेही पोंक्षे यांनी नमूद केले.
इतिहास, संस्कृती आणि शिक्षणपद्धतीवर भाष्य :
भारतावर अनेक वर्षे परकीय आक्रमणे झाली आणि त्याचा परिणाम हिंदू समाजाच्या मानसिकतेवर झाला, असे पोंक्षे म्हणाले. ब्रिटिशांनी भारतीयांना त्यांच्या इतिहास, संस्कृती आणि भाषेपासून दूर केले तसेच इंग्रजी शिक्षणपद्धती लादली, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अनेकांना स्वतःच्या संस्कृतीबद्दल न्यूनगंड निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय शिक्षणपद्धती आदर्श होती आणि समाजातील सर्व वर्ण समान मानले जात होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. हिंदू धर्म माणुसकी, प्रेम आणि संपूर्ण विश्वासाठी प्रार्थना करणारा धर्म असल्याचे सांगत ब्रिटिशांनी ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणातून समाजात जातीय भेद निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.
Sharad Ponkshe | हिंदू समाजाने जागरूक राहण्याचे आवाहन :
यावेळी बोलताना पोंक्षे यांनी हिंदू समाजाने अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचे सांगितले. आर्थिक व्यवहार करताना जागरूकता ठेवावी आणि समाजात घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच देश अधिकृतपणे हिंदूराष्ट्र घोषित व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुंदा पानसे भजनी मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. सुकृती कथ्थक डान्स अकॅडमीकडून गणेश वंदना सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील ढोले यांनी केले. यावेळी संघाचे परमहंस नगर संघचालक हिरामण जगताप, नगरसेविका ज्योत्स्ना कुलकर्णी, मनीषा बुटाला, नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.






