Fee Regulatory Authority | महाविद्यालयांनी अतिरिक्त शुल्क आणि अनामत रक्कम घेतल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शुल्क नियामक प्राधिकरणाने (एफआरए) दिला आहे. त्यानंतरही राज्यातील अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क आकारत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संबंधित प्रशासनाला न घाबरता, संबंधित महाविद्यालयाच्या विरोधात तक्रार करण्याचे आवाहन ‘एफआरए’चे सदस्य डॉ. अर्जुन खिलारे यांनी केले आहे. (Fee Regulatory Authority)
‘शुल्क नियामक प्राधिकरणाने विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या अनामत रकमेची कमाल मर्यादा निश्चित केलेली आहे. नियामक प्राधिकरणाने २५ ऑक्टोबर २०२४ च्या बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या नियमावलीत हा निर्णय घेतला होता. त्यानुसार, अनामत रक्कम आकारण्यावर निर्बंध आले आहेत. विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम केवळ एकदाच आकारली जाईल. हे शुल्क प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर परत करणे महाविद्यालयांना बंधनकारक आहे.
नियम काय सांगतात? :
एफआरए अधिनियम २०११ मधील कलम १५ (२) नुसार, कोणत्याही संस्थेला शैक्षणिक वर्षात एका वर्षापेक्षा अधिक शुल्क आकारता येणार नाही.
या कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित संस्थेविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही एफआरएने दिला आहे.
प्रवेश प्रक्रियेदरम्यान नियमांचे काटेकोरपणे पालन करावे; अन्यथा विद्यार्थी-पालकांनी तक्रारी केल्यास प्राधिकरणाकडून कठोर कारवाई केली जाईल. (Fee Regulatory Authority)
राज्यातील अनेक शिक्षण संस्थांकडून पैसे कमावण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना जादा शुल्क आकारले जाते. वसतिगृहातून आणि मेसच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊनही नंतर गैरसोय केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांचा छळ होतो. अशा गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरणाने वसतिगृह आणि मेसची सुविधा उपलब्ध करून देण्यावरही सक्ती आणली आहे. अशाप्रकारे शुल्क आकारणी टाळण्याचे आदेश एफआरए प्रशासनाने दिले आहेत.






