Maharashtra | मराठवाडा, सांगली-सातारा भागात झालेल्या अतिवृष्टीनंतर सरकारने शेतकऱ्यांना मदत निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राज्यभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांचे दौरे चालू आहेत. काल 25 सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यात राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पाहणी केली. त्यानंतर आता सरकारने नवीन जीआर मांडला आहे. या जीआरनुसार शेतकऱ्यांना एका हेक्टर मागे साडे आठ हजारापेक्षा जास्त रकमेची मदत होणार आहे. या मदतीमध्ये वाढ व्हावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली आहे. याबाबत मंत्री मकरंद पाटील (Makrand Patil) यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही मदत प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार असून शेतकऱ्यांना एकटे सोडले जाणार नाही असे मंत्री पाटील शेतकऱ्यांची सवांद करताना म्हंटले. स्थानिक प्रशासनाकडून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना दिलासा :
राज्यभरात मंत्र्यांची पाहणी चालू असताना दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी देखील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौरे केले. मराठवाड्यातील बीड, धाराशिव, जालना, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांना त्यांनी दौरा केला होता.
“माझ्या हातात काही नसले तरी मी तुमच्या पाठीशी आहे. कोणीही खचू नका, वेडेवाकडे पाऊल उचलू नका” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेऊ नये यावर त्यांनी भर दिला. (Uddhav thackeray Statement)
Maharashtra | मराठवाड्यात परिस्थिती गंभीर :
यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकल्या. “मराठवाड्यात पहिल्यांदाचं असे दृश्य दिसतंय. आधी दुष्काळाची झळ बसायची, पण आता पावसाने सगळं उध्वस्त केलंय. हे संकट खूप मोठे आहे. तुमची कर्जमाफी मागणी योग्य आहे, पण या प्रसंगी मी त्यावर भाष्य करणार नाही, कारण ते राजकारण ठरेल. मात्र सरकारने जाहीर केलेली मदत 2023 च्या निकषानुसार आहे, जी परिस्थिती पाहता अपुरी आहे. ” असेही ठाकरेंनी नमूद केले.
गेल्या काही दिवसात मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे. मोठ्या प्रमाणावर शेतजमीन आणि पिकांचे नुकसान झाले आहे. बीड, जालना, लातूर आणि परभणी जिल्हे अतिवृष्टीमुळे भरडले जात आहेत. कापूस, सोयाबीन, तूर अशा हंगामी पिकांचे नुकसान झाले आहे. फक्त शेत जमीनच नाही तर, पशुधन व घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये निराश्याचे वातावरण झाले आहे.






