Aayush Komkar Murder Case | पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. ५ सप्टेंबर रोजी घडलेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणामागे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या खुनाचा सूड असल्याचे समोर आले आहे. वनराज आंदेकर यांच्या वडिलांनी आयुष कोमकरचा खून घडवून आणल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या तपासात आता नवे धागेदोरे समोर येत असून मास्टरमाईंडपर्यंत पोलीस पोहोचले आहेत.
आरोपी कृष्णा आंदेकरची कोठडी :
या खून प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून समोर आलेला कृष्णा आंदेकर (Krushna Andekar) अखेर पोलिसांना शरण आला. त्याला विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी त्याने शस्त्र पुरवले असून हत्या कुठे आणि कशी प्लॅन झाली याबाबत चौकशी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. (Aayush Komkar Murder Case)
न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील चौकशीतून अनेक स्फोटक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Aayush Komkar Murder Case | आरोपीचा दावा :
सरकारी वकिलांच्या मते, आयुष कोमकरच्या खुनासाठी वापरलेले शस्त्र कृष्णा आंदेकरनेच अमन पठाणला दिले होते. हे शस्त्र कुठून आणले, इतर आरोपींसोबत त्याचा संपर्क कसा होता आणि फरार झाल्यानंतर तो कुठे थांबला होता, या गोष्टींचा तपास करायचा आहे. या प्रकरणात एकूण १३ आरोपी असून सर्व आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींच्या आर्थिक बाबींचाही तपास होणार आहे.
कृष्णा आंदेकरच्या वकिलांनी मात्र न्यायालयात वेगळा दावा केला. आरोपीने स्वतःहून पोलिसांकडे शरणागती पत्करली असल्याने कोठडीची गरज नाही, असे सांगितले. “मी सकाळी १० वाजता कोर्टात हजर झालो आहे. बाकी सर्व आरोपी कोठडीत आहेत, त्यामुळे मला कोठडीची गरज नाही,” असा दावा करण्यात आला. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला आणि दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.






