नोकरदारांनो देशात 4 दिवसांचा आठवडा लागू होणार? सरकारने दिले संकेत

On: December 14, 2025 4:51 PM
4 Days Work Week
---Advertisement---

4 Days Work Week | देशात चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी असा आठवड्याचा पॅटर्न लागू होणार का, याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. युरोपमधील काही देशांमध्ये आधीच ही कार्यसंस्कृती राबवली जात असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. आता भारतातही नवीन कामगार संहितेमधून (Labour Codes) याबाबत सरकारने महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

सध्या भारतातील दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, गुरुग्राम, नोएडा यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रामुख्याने 5 दिवसांचा कामाचा आठवडा लागू आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे अधिकृत संकेत :

केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 12 डिसेंबर 2025 रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, नवीन कामगार संहितेनुसार आठवड्यातील कमाल कामाचे तास 48च राहणार आहेत. मात्र, या 48 तासांचे विभाजन कसे करायचे, याबाबत आस्थापनांना लवचिकता देण्यात आली आहे.

नवीन नियमांनुसार, जर एखाद्या कंपनीने चार दिवसांचा कामाचा आठवडा लागू केला, तर कर्मचाऱ्यांना दररोज 12 तास काम करावे लागेल. अशा परिस्थितीत उर्वरित तीन दिवस पगारी सुट्टी देणे कायदेशीरदृष्ट्या शक्य असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

4 Days Work Week | ओव्हरटाईमबाबत काय नियम? :

मंत्रालयाने हेही स्पष्ट केले आहे की, आठवड्यातील 48 तासांपेक्षा अधिक काम करून घेतल्यास कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईमचे दुप्पट वेतन देणे बंधनकारक असेल. तसेच, 12 तासांच्या पाळीत काम करताना कर्मचाऱ्यांना योग्य ब्रेक देणेही अनिवार्य राहील.

महत्त्वाची बाब म्हणजे, चार दिवसांचा आठवडा सर्व कंपन्यांसाठी बंधनकारक नाही. ज्या आस्थापना आणि कर्मचारी या पद्धतीसाठी सहमत असतील, तिथेच हा पर्याय राबवता येणार आहे. म्हणजेच, हा नियम सक्तीचा नसून पर्यायी आणि लवचिक स्वरूपाचा आहे. (4 Days Work Week)

एकूणच, नवीन कामगार संहितेमुळे भारतात कामकाजाच्या पद्धतीत मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी हा पॅटर्न प्रत्यक्षात कधी आणि कितपत लागू होतो, याकडे आता कर्मचारी आणि कंपन्यांचे लक्ष लागले आहे.

News Title : 4-Day Work Week in India? Government Hints Through New Labour Code

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now