पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वात मोठी कारवाई; प्रशासनाने ३६ बंगले जमीनदोस्त केले

On: May 20, 2025 4:24 PM
---Advertisement---

Indrayani River | पिंपरी-चिंचवड शहरातील इंद्रायणी नदीच्या पूररेषेमध्ये बांधलेले ३६ बंगले प्रशासनाने जमीनदोस्त केल्यानंतर रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या कारवाईनंतर काही रहिवाशांनी, विशेषतः एका महिलेने, या घटनेसाठी बिल्डर मनोज जरे यांच्यासोबत भाजपचे माजी महापौर राहुल जाधव यांना जबाबदार धरले आहे. मात्र, राहुल जाधव यांनी हे आरोप फेटाळून लावत त्यांचा किंवा भाजपचा बिल्डर मनोज जरे यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राहुल जाधव यांचे स्पष्टीकरण

माजी महापौर राहुल जाधव यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नोटिसा आल्यानंतर संबंधित रहिवासी त्यांच्याकडे मदतीसाठी आले होते. मनोज जरे हे त्यांच्या भागातील असल्याने त्यांची ओळख होती आणि त्यांनीही मदतीची विनंती केली होती. एक लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना आधार देणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे हे आपले कर्तव्य आहे, त्यामुळे त्यांनी रहिवाशांना आधार देण्याचा प्रयत्न केला. बंगल्यांना नोटिसा आल्यानंतरच आपल्याला ते प्लॉटिंग जरे यांनी केल्याचे समजले, असे जाधव यांनी नमूद केले. गेल्या एक-दोन वर्षांपासून ते या लोकांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.

जाधव यांनी स्पष्ट केले की, हे प्लॉटिंग निळ्या पूररेषेमध्ये झाले होते आणि त्यानंतरच त्यांना नोटिसा आल्या. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी रहिवाशांना आधार दिला आणि येणाऱ्या काळात पूररेषेतील भाग निवासी होईल आणि घरे नियमित होतील, असे आश्वासन दिले होते. रहिवाशांनी या प्रकरणी कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही खटला दाखल केला होता, तसेच महानगरपालिकेनेही नोटिसा दिल्या होत्या. या सर्व परिस्थितीत आपण त्यांना आधार दिला, असे जाधव म्हणाले. एका महिलेने आपले नाव घेतले कारण त्यांनी ‘घाबरू नका, आपण यावर पर्याय काढू’ असे आश्वासन दिले होते, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिका प्रशासनाने कारवाई केली, असे जाधव यांनी पुढे स्पष्ट केले.

रहिवाशांना भरपाई देण्याचे आश्वासन

राहुल जाधव यांनी मनोज जरे हे व्यावसायिक असून त्यांचा किंवा भाजपचा त्यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की, नोटिसा आल्यानंतर जरे त्यांच्याकडे आले होते आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी जरे यांना समजावले. “या लोकांना मदत केली पाहिजे,” असे सांगत जाधव यांनी रहिवाशांना मदत करण्याचे आश्वासन दिले. बंगल्यांवर कारवाई झाल्यानंतर अनेक रहिवासी त्यांच्याकडे आल्याने, आपण त्यांना सांगितले की यापुढेही त्यांना मदत करत राहू.

यावर तातडीने कार्यवाही करत, राहुल जाधव यांनी मनोज जरे यांना बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले की लोकांना झालेले नुकसान भरून द्यावे लागेल. या बैठकीत रहिवासी आणि मनोज जरे यांच्यासह विशाल मोरे देखील उपस्थित होते. या चर्चेनुसार, ज्यांचे बंगले पडले आहेत, त्यांना झालेले नुकसान भरपाई म्हणून घराच्या स्वरूपात, आर्थिक स्वरूपात किंवा जागेच्या स्वरूपात, असे त्यांना परवडेल अशा पद्धतीने भरपाई देण्याचे ठरले आहे, अशी माहिती जाधव यांनी दिली. ज्या लोकांची घरे पडली आहेत, त्यांच्या संपर्कात मनोज जरे असून, येत्या दोन दिवसांत रहिवाशांना समाधानकारक मोबदला मिळेल, असे आश्वासन राहुल जाधव यांनी दिले आहे.

Title: 36 Bungalows in Indrayani River Flood Line Demolished; Former BJP Mayor Blamed, Promises Compensation

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now