Gold Silver Rate l सोन्याच्या (Gold) दरात पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या खरेदीला उधाण येते, पण सतत बदलणाऱ्या दरामुळे ग्राहक संभ्रमात आहेत. देशांतर्गत बाजारासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातही चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
सोने दररोज नवा उच्चांक गाठतंय
सकाळच्या व्यवहारात एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. १० ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल ८६४ रुपयांनी वाढून ९६,४०० रुपये झाला आहे. ही दरवाढ म्हणजे मध्यमवर्गीय खरेदीदारांसाठी एक मोठं आर्थिक आव्हानच आहे.
देशांतर्गत सराफा बाजारात सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ८९,९०० रुपये प्रति तोळा (१० ग्रॅम) असून २४ कॅरेट सोनं ९८,०८० रुपये प्रति तोळा या दराने विकले जात आहे. ही किंमत गेल्या काही दिवसांतील सर्वाधिक असल्याचे जाणकार सांगतात. दुसरीकडे, चांदीच्या दरात मात्र किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. काल १,००,००० रुपये असलेला चांदीचा (Silver) दर आज ९९,९०० रुपयांवर आला आहे.
सध्याच्या वाढीमागे आंतरराष्ट्रीय कारणेही आहेत. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात व्यापार युद्ध, चलनातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत. देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्यानेही किमतीवर परिणाम होत आहे.
घरबसल्या जाणून घ्या दर :
दरम्यान, २४ कॅरेट सोनं हे शुद्धतम स्वरूपातलं सोनं मानलं जातं, म्हणजे त्यात ९९.९ टक्के सोनं असतं. पण ते इतकं मऊ असतं की त्यापासून दागिने बनवणं कठीण होतं. दैनंदिन वापरात असे दागिने लवकर वाकतात किंवा तुटण्याची शक्यता वाढते. म्हणूनच दागिन्यांसाठी प्रामुख्याने २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.
तुम्हाला २२ कॅरेट किंवा २४ कॅरेट सोनं आणि चांदीचे दर जाणून घ्यायचे असतील, तर ८९५५६६४४३३ या IBJAच्या अधिकृत क्रमांकावर फक्त एक मिस्ड कॉल द्या. काही क्षणांतच तुम्हाला SMS द्वारे त्या दिवशीचे दर मिळतील.






