Maharashtra Voter List | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ उघड झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी राज्य निवडणूक आयोगाला भेट देऊन गंभीर तक्रारी केल्या असून, काही जिल्ह्यांमध्ये अख्खी गावेच मतदार यादीतून गायब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Maharashtra Voter List)
अमरावतीत 19 गावं गायब, ग्रामस्थांमध्ये संताप :
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील तब्बल 19 गावे मतदार यादीतून गायब झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत औपचारिक तक्रार दाखल केली आहे. ते म्हणाले, “मतदार यादी तपासताना नावे नाहीतच, पण पूर्ण गावेच गायब आहेत. आमच्या भागातील मतदान विरोधकांना मिळत असल्याने जाणीवपूर्वक गावांची नावे वगळली गेली असावीत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. (19 Villages Missing from Voter List in Maharashtra)
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाने प्रारूप यादी प्रकाशित करायची होती. मात्र अनेक ग्रामपंचायत कार्यालयात यादीच प्रसिद्ध झालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे निवडणूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Maharashtra Voter List | “तांत्रिक अडचणींमुळे यादी अपलोड नाही” – अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण :
या वादानंतर ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी सांगितले की, काही तांत्रिक कारणांमुळे निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर यादी अपलोड झाली नाही. संबंधित भागाचे कंट्रोल चार्ट तयार करून नावे नव्याने अपलोड केली जात आहेत. “ही केवळ प्रारूप मतदार यादी आहे, अंतिम यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Maharashtra Voter List)
अमरावतीनंतर चंद्रपूर जिल्ह्यातही असाच प्रकार समोर आला आहे. काँग्रेस नेते आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी आरोप केला की, राजुरा मतदारसंघातील 6850 मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली. या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल असूनही चौकशी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. (19 Villages Missing from Voter List in Maharashtra)
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव नगरपालिकेत हजारो हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. प्रारूप यादीत एका व्यक्तीचं नाव दोन प्रभागात दिसल्यासारख्या अनेक चुकांमुळे सुमारे तीन हजार नागरिकांनी हरकती दाखल केल्या आहेत. प्रशासन या सर्व तक्रारींची छाननी करत असून, दुरुस्त्या करण्याचं काम सुरू आहे.






